कार्यक्रम/उत्सव

मंदिरामध्ये दैनंदिन पूजा-अर्चा व वार्षिक सण समारंभ वर्षानुवर्षे परंपरागणपणे अव्याहत चालू आहेत.

Image 01

नित्य दिनक्रम

वर्षानुवर्षे श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिरात खालील नित्य सेवाकार्ये अखंडपणे पार पाडली जात आहेत.

१) पहाटे ५ वाजता - पहाटेची शेजारती (देवाला झोपेतून जागे करणे).
२) पहाटे ६ वाजता - अभिषेक (ब्राह्मणांच्या हस्ते).
३) सकाळी ७ वाजता – सोवळे पाळून सालकऱ्यांकडून मूर्तींना दही, दूध आणि गरम पाण्याने स्नान घालणे. मूर्तींना विविध पोशाख घालणे.
४) सकाळी ८:३० वाजता – सालकऱ्यांच्या हस्ते देवांची आरती. सर्व भक्तांच्या आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत.
५) दुपारी ३ वाजता – दुपारची शेजारती (आठवडेकरी गुरव यांच्या हस्ते).
६) रात्री ८:३० वाजता – सोवळे पाळून सालकऱ्यांच्या हस्ते देवांची आरती. सर्व भक्तांच्या आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत.
७) रात्री ९ वाजता - मूर्तींची पोशाख काढून रात्रीची शेजारती (देवाला झोपविणे).

रविवार हा श्री सिद्धनाथ वार असल्याने नाथांची घोड्यावर आणि जोगेश्वरींची हत्तीवर विशेष पूजा बांधली जाते. त्याचप्रमाणे संध्याकाळी विशेष आरती होते. सालकरी आरती घेवुन गावातील मरीआई माता मंदिर, कोटेश्वर महादेव मंदिर आणि मारुती मंदिरात जातात.

वार्षिक कार्यक्रम

श्री.सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिरात वर्षभरात विविध उत्सव, सण पारंपरिक पद्धतीने अविरत पिढ्यानपिढ्या अतिशय उत्साहात साजरे केले जातात.

चैत्र

गुढीपाडवा

चैत्र शु. प्रतिपदेच्या दिवशी मंदिरात गुढी उभारली जाते. सर्व पुजारी, भक्तगण व ब्राह्मण एकत्र जमून पंचांग वाचन करतात. चैत्र प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीत श्री. शंभू महादेव शिखर शिंगणापूरची यात्रा असते. या यात्रेला येणारे भाविक मोठ्या संख्येने श्री. सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येतात.

वैशाख

सालकरी बदल

वैशाख पौर्णिमा ते पुढील वर्षीची वैशाख पौर्णिमा हा कालावधी श्री. सिद्धनाथाची पूजा करणारे सालकरी (गुरव) यांचा असतो. सालकरी दरवर्षी बदलत असतात.

जेष्ठ व आषाढ

आषाढी वारी

आषाढ महिन्यात पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या पालखी मिरवणुका श्री. सिद्धनाथ मंदिरात मुक्काम करून भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतात.

श्रावण

गोकुळाष्टमी

श्री सिद्धनाथ हे भगवान शंकराचे स्थान असल्याने अनेक भक्त पोथी, पुराण, उपवास इत्यादी धार्मिक कार्यक्रम श्रावण महिन्यात करतात. तसेच गोकुळाष्टमी (श्रीकृष्ण जयंती) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच अनेक भक्त श्री. सिध्दनाथास दहीभाताची पूजा बांधतात.

भाद्रपद

गणेशोत्सव

श्री. पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अश्विन

दुर्गोत्सव

श्री. दुर्गा उत्सव देखील दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. अश्विन शु.१० (दसरा) या दिवशी सर्व अलंकारांसह श्री नाथांची महापूजा बांधली जाते. दोन्ही उत्सवमूर्ती सालकरी यांचे घरी नेऊन त्यांना दही-दुधाने आंघोळ घालून त्यांना पोशाख घालतात. श्री. नाथांच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून सीमोल्लंघनासाठी माणगंगा नदीच्या तीरावर नेतात. गावातून हि पालखी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत जाते. माणगंगा नदीच्या तीरावर सोने लुटून सीमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होतो.

कार्तिक

अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा दररोज सकाळी ६ वाजता हत्तीसमोर भक्तांचे भजन-कीर्तन चालू असते.

घटस्थापना

श्री. सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध-१ (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभाऱ्याजवळ असणाऱ्या म्हातारदेवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात. हे घट १२ दिवसांचे असतात.

Image 01
कार्तिक

नवरात्रोत्सव

या काळात सर्व पुजारी व भाविक १२ दिवस उपवास करून श्रींची भक्ती करतात. याला नवरात्र म्हणतात. श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र १२ दिवसांचे असते. या घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो कार्तिक शु. प्रतिपदा ते द्वादशी असे १२ दिवस श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये अनेक भक्त आणि पुजारी नंदादीप मंदिरात आपला वेळ घालवतात आणि मोठा दीपोत्सव साजरा करतात. अनेक भाविक १२ दिवस नवरात्री मोठ्या भक्तिभावाने पाळतात.

Image 01
कार्तिक

हळदी समारंभ

याच दिवशी (कार्तिक शुद्ध प्रतिपदेला) दुपारी १२ वाजता श्रींचा हळदी समारंभ होतो. श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनई-चौघडा, बॅंड यांच्या मंगल गजरात हा हळदी समारंभ होतो.

Image 01
कार्तिक

दिवाळी मैदान

कार्तिक शुद्ध द्वितीया (भाऊबीज) या दिवशी संध्याकाळी श्री.नाथांची आरती घेऊन सालकरी हे अनेक भक्तजनांसह गावाच्या उत्तरेकडे असलेल्या राळ्याचे खळे येथील म्हातारदेव यांना भेटायला जातात. भेटून परत येत असताना गावाच्या वेशीपासून संपूर्ण पेठेतून मंदिरापर्यंत अनेक भक्तजन व व्यापारीवर्ग लाखो रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करून श्री.सिद्धनाथांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात आणि सर्व सुहासिनी सिद्धनाथांना ओवाळतात. या मैदानाच्या सोहळ्यात गावातील अनेक मानकरी आपली दिवटी घेऊन सहभागी होतात.

कार्तिक

श्रींचा विवाह सोहळा

कार्तिक शुद्ध १२ (बारस-तुळसी विवाह) या दिवशी गावात मोठा उत्साह असतो. घरोघरी पुरणपोळीचा महानैवेद्य करून देवाला दाखविला जातो. त्या दिवशी दुपारी देवांच्या उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या घरी जातात. पंचामृत स्नान, पूजा, पोशाख व अलंकार परिधान करून मूर्तींना मंदिरात आणले जाते. मंदिरातील सभामंडपातील सुशोभित केलेल्या हत्तीवरील अंबारीत श्री.सिद्धनाथांची मूर्ती विराजमान होतात. अनेक भाविक आपल्या काठ्या, दिवट्या, ढोल, लेझीम, गजी घेऊन मोठ्या आनंदाने या उत्सवात सहभागी होतात.

रात्री साडेअकरा वाजता नाथांच्या मूर्तीला विवाहासाठी मुख्य पुजारी (सालकरी) आपल्या छातीला बांधून हत्तीपासून मंदिराच्या गाभाऱ्यात नेतात. गाभाऱ्यात जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह पारंपरिक, धार्मिक, विधिपूर्वक, शास्त्रोक्त पद्धतीने रात्री १२ वाजता मोठ्या थाटाने श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो.

Image 01
कार्तिक

काळभैरवाष्टमी

कार्तिक कृ. ८ (कालभैरव अष्टमी) या दिवशी श्री. सिद्धनाथांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या दिवशी मंदिरात मोठा दिपोत्सव साजरा करतात आणि रांगोळीची सुंदर सजावटही करतात.

मार्गशीर्ष

रथयात्रा

मार्गशीर्ष शुद्ध १ प्रतिपदा (देवदीपावली) या दिवशी श्री. सिद्धनाथ व माता जोगेश्वरींची रथयात्रा असते. दणकट, मजबूत आणि भव्य अशा लाकडी, चंदनाच्या रथामध्ये श्रींच्या उत्सवमूर्ती दुपारी १२ वाजता बसविल्या जातात. रथाला मोठे दोर बांधून माणसांच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो. या उत्सवात भाविक सिद्धनाथाचा रथ ओढत गावाभोवती नगरप्रदक्षिणा घालतात

माणगंगेच्या पात्रातून शहराला उजवी प्रदक्षिणा घालून दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही श्रींची रथातील "वरात' रात्री १२ च्या पुढे मूळ ठिकाणी येते. दरम्यानच्या काळात रथावर गुलाल-खोबऱ्याची उधळण भव्य प्रमाणात होत असल्याने या दिवशी संपूर्ण म्हसवड नगरी गुलालाच्या रंगामध्ये न्हाऊन निघते.


श्रींच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती घेऊन रथामध्ये ठेवण्याचा मान गुरव समाजाला आहे. तर रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. हा रथ ओढण्याचा मान माळी समाजाला, तसेच बारा बलुतेदारांनाही रथ ओढण्याचा मान आहे. या यात्रेचे सर्व नियोजन व प्रशासन म्हसवड नगरपरिषद पाहते.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा हळदी, विवाह व वरात म्हणजे रथयात्रा हे कार्यक्रम पूर्वांपार, पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहे व अव्याहत सुरू आहे.

Image 01
माघ

महाशिवरात्र

माघ कृ. ४ या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. वर्षातून एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भुयारातील स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते. तेवढी रात्र संपल्यावर भुयार बंद केले जाते, ते वर्षभर बंद असते.

या स्वयंभू पिंडीच्या बरोबर वर श्री.सिद्धनाथांची मूर्ती आहे. तसेच या भुयाराच्या बंद प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायमपणे वर्षभर ठेवलेल्या असतात.